‘अवतरण’ला ‘अक्षरबंध’चा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

पुणे, १३ डिसेंबर २०२२ : नाशिक येथील अक्षरबंध प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात मुंबई येथील राहुल गडपाले संपादित ‘अवतरण’ या दिवाळी अंकाची २०२२ चा ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. रोख २००० रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उल्लेखनीय अंक म्हणून मुंबई येथील ‘माझा’, तर नाशिक येथील स्वानंद बेदरकर यांच्या ‘शब्दमल्हार’ दिवाळी अंकाची विशेष पुरस्कार म्हणून निवड करण्यात आली आहे.

वाचन चळवळीत शतकोत्तर परंपरा असलेल्या दिवाळी अंकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाकाळातही अनेक दिवाळी अंकांनी ही परंपरा यशस्वीरीत्या चालवली, अशा दिवाळी अंकांचा गौरव व्हावा म्हणूनच ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’च्या वतीने दिवाळी अंकांसाठी राज्यस्तरीय पुरस्कारांची सुरवात केली. महाराष्ट्रातील विविध दिवाळी अंकांनी यात सहभाग घेतला.

‘उत्कृष्ट विषयाचा’ पुरस्कार पुणे येथील ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाला; तसेच ‘उत्कृष्ट मांडणीसाठी’ पुणे येथील स्वाती लांडकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘व्हाइट स्पेस’ या दिवाळी अंकाची निवड करण्यात आली. ‘उत्कृष्ट मुखपृष्ठा’साठी पुणे येथील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्र संशोधन मंडळाच्या किरण केंद्रे यांनी संपादित केलेल्या आणि चंद्रमोहन यांनी साकारलेल्या ‘किशोर’ या दिवाळी अंकाची निवड करण्यात आली. रोख १००० रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’चे प्रवीण जोंधळे, सप्तर्षी माळी, साई बागडे, सुवर्णा घुगे, कल्याणी बागडे, डॉ. गणेश मोगल आणि योगेश विधाते आदी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा