छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत अक्षय कुमारने चित्रीकरणाला केली सुरवात

मुंबई, ६ डिसेंबर २०२२ : अभिनेता अक्षय कुमार त्याचा वेगवेगळ्या भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याची कामाप्रती एकाग्रता त्याच्या चित्रपटांमधून सहज दिसून येते. अशा या बहुचर्चित अभिनेत्याच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करीत अक्षयने चित्रीकरणाला सुरवात झाल्याची माहिती दिली.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करीत अक्षय म्हणाला, “आज मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ याच्या शूटिंगला सुरवात करतो आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारावयास मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो. मी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि आई जिजाऊ यांच्या आशीर्वादाने माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन. माझ्यावर आशीर्वाद राहू द्या.”

या चित्रपटाच्या घोषणेनंतर या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटात चुकीचे संदर्भ, चुकीची नावे असून, मावळ्यांची वेशभूषाही अयोग्य असल्याचे आरोप केले गेले; परंतु या सर्वांतून बाहेर पडून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. चित्रपटात अक्षय कुमार सोबतच जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. तर हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती महेश मांजरेकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे हा चित्रपट २०२३ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा