Akshaya Tritiya gold vs silver investment trend : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीची लगबग सुरू झाली असताना, गुंतवणूकदारांसमोर चांगल्या परताव्याचा प्रश्न उभा आहे. गेल्या काही वर्षांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पारंपरिक खरेदीदारांसोबत गुंतवणूकदारांचाही रस वाढला आहे. सराफा बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी नोंदणी केल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सराफा व्यावसायिकांच्या माहितीनुसार, मागील १६ महिन्यांत चांदीच्या दरात तब्बल ६३ हजारांची वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी ७५ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी १ एप्रिल २०२५ पर्यंत १ लाख २ हजार रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, चांदीने सुमारे २० टक्के परतावा दिला आहे.
दुसरीकडे, सोन्याने या काळात अधिक आकर्षक परतावा दिला आहे. १६ महिन्यांत सोन्याच्या दरात २६ हजार ८०० रुपयांची वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी ६३ हजार ९०० रुपये प्रति तोळा असलेला सोनेचा भाव १ एप्रिल २०२५ रोजी ९० हजार ७०० रुपयांवर गेला आहे. सराफा व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, सोन्याने गुंतवणूकदारांना तब्बल ३५ टक्के परतावा मिळवून दिला आहे.
या आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे अधिक झुकण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे नेहमीच फायदेशीर मानले जाते आणि यावर्षी तर सोन्याने गुंतवणुकीच्या दृष्टीनेही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा अक्षय तृतीयेला सोन्याची चमक अधिक असणार की चांदीची झळाळी, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, गुंतवणूकदारांसाठी सोने निश्चितच एक आकर्षक पर्याय म्हणून समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे