पिंपरी चिंचवड, १९ नोव्हेंबर २०२२ ः संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी दिन सोहळा आणि कार्तिकी एकादशी आळंदी यात्रा उद्या, रविवारी (ता.२०) लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी होत असून, खांद्यावर भगवी पताका, टाळ-मृदंगाचा अन् हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे आणि मागील वर्षी काही प्रमाणात असलेल्या निर्बंधांमुळे वारीचा उत्साह अल्पसा होता. यंदा मात्र कमालीचा उत्साह दिसून येत आहे. राज्यभरातून आलेल्या वैष्णवांच्या मांदियाळीने अलंकापुरी दुमदुमली असून, वारकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीने गजबजून गेली आहे.
आळंदीत कार्तिक वद्य अष्टमीपासून माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली. मोठ्या संख्येने भाविक अष्टमीपासूनच येण्यास सुरवात झाली. संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचा पालखी सोहळा तसेच वासकर, शिरवळकर, राशीनकर यांच्यासारख्या परंपरागत दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. पहाटे इंद्रायणी स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी होत असून, घाटाच्या परिसरात दिवसभर गर्दी होती. दर्शनबारीतून मोठ्या संख्येने भाविक समाधी दर्शन घेत आहेत. अनेकजण कळसदर्शन करताना दिसत आहेत.
परिसराला जत्रेचे स्वरूप
शहरातील प्रदक्षिणा रस्ता, गोपाळपुरा, देहू- आळंदी रस्ता, नवीन पुलाकडील रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी आहे. तंबू आणि धर्मशाळांमधून माऊली माउलीचा गजर आणि टाळमृदंगाचा गजर कानी पडत आहे. माउलींच्या समाधीसाठीची दर्शनबारीची रांग पूर्ण भरून भक्ती सोपान पुलावरून नदीच्या पलीकडे इंद्रायणी तीरी प्रशस्त दर्शनमंडपात गेली आहे. राज्यभरातून कोकण, खानदेश, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातून दिंड्यांचा ओघ सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातून दिंड्या तसेच कोकण भागातील दिंड्यांमधून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत आहेत. पोलीसांनी प्रदक्षिणा रस्त्यावर तसेच मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे. प्रदक्षिणा मार्गावर व्यावसायिकांना पूर्णपणे बंदी घातली आहे.
रविवारी (ता. २०) एकादशी असल्याने माऊलींच्या समाधीवर पवमानपूजा होणार आहे. मध्यरात्रीपासून एकादशीनिमित्त माउलींना पवमान अभिषेक होणार असल्याने या काळात भाविकांसाठी दर्शनबारी बंद ठेवण्यात येणार आहे. पहाटपूजा झाल्यानंतर पहाटे तीनच्या दरम्यान पुन्हा दर्शनबारी सुरू केली जाईल.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान एकादशीचा मुख्य कार्यक्रम- मध्यरात्री १२ ते २ ः माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक आणि दुधारती- पहाटे २ नंतर ः भाविकांचे दर्शन- दुपारी १२ ते १२.३० ः महानैवेद्य- दुपारी १ ः माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा- रात्री ८.३० ः धुपारती- रात्री १२ ते ४ ः मोझे यांच्यातर्फे जागर.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील