मल्टिप्लेक्स थिएटर्स साठी धोक्याची घंटा, बिग बजेट चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नुकसान

मुंबई १७ मे २०२३ : फिल्म इंडस्ट्रीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणे खूप महाग झाले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाला मल्टिप्लेक्स परवडेनाशी झालीयत. अशातच कोरोना काळापासून सातत्याने बिग बजेट चित्रपट फ्लॉप होत असल्याने फिल्म इंडस्ट्रीला मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागतंय. प्रेक्षकांनी मल्टिप्लेक्सकडे पाठ फिरवल्यामुळे, PVR- INOX यांसारख्या मल्टिप्लेक्स कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, त्यांचे सुमारे ५० अंडर परफॉर्मिंग थिएटर्स आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

मार्च २०२३ मध्ये PVR Limited आणि Inox Leisure या दोन कंपन्या एकत्र होऊन आता PVR Inox Limited बनल्या आहेत. फिल्म इंडस्ट्री ​​​​​​​अहवालानुसार २०२३ या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत PVR- INOX ला ३०० कोटी अधिक रुपयांचा तोटा झाला आहे. तर गेल्या वर्षी १७० कोटींचा तोटा झाला होता. आता PVR- INOX पुढील ६ महिन्यांत ५० चित्रपटगृहे बंद करण्याचा विचारात आहे.

बड्या स्टार्सच्या चित्रपटांच्या सरासरी प्रदर्शनामुळे फिल्म इंडस्ट्रीला सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे. २०२३ या वर्षाची खराब सुरुवात अर्जुन कपूर, तब्बू अभिनित ‘कुत्ते’ या फ्लॉप चित्रपटाने झाली. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ ने १००० कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला. पण हा चित्रपट अपवाद ठरला. त्यानंतर आलेले ​​​​​​​’शहजादा’, सेल्फी’ हे चित्रपट त्यांच्या निर्मितीचा खर्चही काढू शकले नाहीत. सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाकडून तसेच अजय देवगणचा ‘भोला’ आणि ‘तू झुठी मैं मक्कार’ कडूनही बऱ्याच अपेक्षा होत्या, मात्र बॉक्स ऑफिसवर हे सरासरी ठीक राहिले.

या परिस्थितीवर फिल्म निर्माते म्हणतात की, चित्रपटगृह बंद होणे हे चित्रपट उद्योगासाठी चांगले नाही. आपल्या देशात आणखी चित्रपटगृहांची गरज आहे. आम्हाला अधिक स्क्रीन्सची गरज आहे. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे खूप महाग झाले आहे, यावर काहीतरी करणे आवश्यक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा