लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधात सकल हिंदू एकवटले

8

पिंपरी-चिंचवड, १८ डिसेंबर २०२२ : ‘लव्ह जिहाद’ विरोधी, गोहत्या, धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येसारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी चिंचवड येथे विविध हिंदू संघटनांनी रविवारी विराट मोर्चा काढला.

मोर्चाद्वारे विविध मागण्यांना वाचा फोडत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या वतीने लहुजी साळवे स्मारक, चिंचवड येथून रविवारी सकाळी दहा वाजता या विराट मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह निगडी, चिखली, प्राधिकरण, देहू , आळंदी नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र, हिंजवडी, गहुंजे येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज; तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारतमातेचा जयघोष करीत घोषणा देण्यात आल्या. लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतरबंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. श्रद्धा वालकर या हिंदू भगिनींचा मारेकरी आफताब पुनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या विराट मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चा जात असलेल्या मार्गावरून दोन्ही बाजूंच्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत मोर्चाला पूर्ण समर्थन दिले.

लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथून निघालेला विराट मोर्चा पिंपरी-चिंचवड मुख्य मार्गाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पोचला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी प्रशासनाला निवेदन दिले. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत होता. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महापुरुषांच्या पुतळ्याला, स्मारकाला अभिवादन करून मोर्चा पुढे सरकत होता. समारोपस्थानी पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आले. व्यासपीठावर छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

मोर्चामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गावरून वळवण्यात आली. तर काही मार्गांवर वाहतूक कासवगतीने पुढे सरकत होती.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निर्घृण खून केल्याचा आरोप असलेल्या आफताब पुनावाला याला क्षणभरही जगण्याचा अधिकार नाही. या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाकर्‍यांनी यावेळी केली. समारोपस्थानी विविध संस्था, संघटना प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त करून लवकरात लवकर कायदे करण्याची मागणी केली.

देशभरात वाढू पाहणाऱ्या लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोवंश हत्या, बेकायदेशीर धर्मांतरण, महापुरुषांचा अवमान आदी विकृतींविरोधात रविवारी हिंदू धर्मातील विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन विराट जनगर्जना मोर्चा काढत एकीची वज्रमूठ भक्कम केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा