काँग्रेसकडून लोकसभेच्या सर्वच जागांची चाचपणी, काँग्रेसची २ आणि ३ जूनला मुंबईत होणार बैठक

नागपूर, २९ मे २०२३ : लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. यासाठी पक्षांतर्गत बैठका आणि आढावा यावर सर्वच राजकीय पक्षङांनी भर दिला आहे. महाविकास आघाडीने तर वज्रमूठ सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठकही झाली आहे. आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन दोन नेत्यांची समन्वय समिती जागा वाटपावर सखोल चर्चा करणार आहेत. अशातच आता काँग्रेस राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागांची चाचपणी करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमके काय घडतेय? असा सवाल केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची २ आणि ३ जूनला मुंबईत बैठक होणार आहे. राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणी करण्यासाठी काँग्रेसची ही बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातंही काँग्रेसची चाचपणी होणार आहे. या चाचपणीच्या आधारावर काँग्रेस महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये जागा मागणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडून ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची ही बैठक होत आहे. लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, आमदार, प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार असून नेत्यांकडून आढावा घेतला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा