जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य- जिल्हाधिकारी

जालना ३१ जुलै २०२४ : नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, समृध्दी महामार्ग यासारख्या वाहतुकीच्या सुविधांसह इतर पायाभूत सुविधा जिल्हयात उपलब्ध असल्याने उद्योजकांनी आपला उद्योग या जिल्ह्यात अवश्य उभारावा, यासाठी जिल्हा प्रशासनाचे उद्योजकांना सर्व सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग(MSME) क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र शासनाची धोरणे, उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी उद्योजक व निर्यातदार यांच्याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा (IGNITE MAHARASHTRA-2024) संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना हा कृषी प्रधान जिल्हा आहे. यासह हा जिल्हा स्टील, बियाणे उद्योगांसाठी प्रसिध्द आहे. आता हा जिल्हा रेशीम उद्योगासाठीही नावारुपाला येत आहे. एकंदरीत जिल्ह्यात उद्योगासाठी अतिशय सकारात्मक पोषक वातावरण असल्याने नवउद्योजकांसाठी उद्योग उभारणीकरीता येथे चांगली संधी आहे. उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल. उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा उद्योजकांना प्राधान्याने लाभ दिला जाईल. सध्या जालन्याचा औद्योगिक विकास पाहता येत्या काळात हे शहर मोठे औद्योगिक शहर म्हणून नक्कीच ओळखले जाईल असं जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणालेत. जालन्यात आयोजित केलेल्या इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेस उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी उद्योग उभारणीसाठी विविध तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, सिंगल विंडोचे (मैत्री) अधिकारी प्रदीप दळवी, सिडबीचे व्यवस्थापकीय अधिकारी मनोज कुमार सहयोगी, जालन्याचे पोस्टमास्टर संदिप महाजन, आयडीबीयचे उपव्यवस्थापक मिलिंद काळे, निर्यात तज्ञ अमोल मोहिते, विमा सल्लागार आनंद अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजक, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा