महाराष्ट्रातील सर्व जनतेला मिळणार ‘आरोग्य सुरक्षा कवच’, उपचार मर्यादा पाच लाखापर्यंत

मुंबई, २९ जून २०२३: एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. आता महाराष्ट्रातील सर्व जनतेला आरोग्य सुरक्षा कवच मिळणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

या योजनेंतर्गत प्रती कुटुंब उपचार खर्च हा प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून ५ लाख रुपये एवढा करण्याचा निर्णय, मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला गेलाय. गृहमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, यंदाचा अर्थसंकल्प मांडतांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेची उपचार मर्यादा दीड लाखावरून पाच लाखापर्यंत करण्याची घोषणा केली होती. याला मंत्रीमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता मिळालीे.

सध्या सुरू असणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य या दोन्ही योजनेत काही बदल करून, योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या योजनांच्या एकत्रित अंमल बजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंतर्गत असणाऱ्या एक हजार रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार मान्यताप्राप्त आहेत.

राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. पण आता राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांत १४० व कर्नाटक राज्यातील १० अतिरिक्त रुग्णालये तसेच अजून २०० रुग्णालयेही या योजने अंतर्गत घेण्याचा निर्णय बैठकीत झाला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून, रस्ते अपघातासाठीच्या उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत तीस हजारांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात १ लाख रूपये, अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा