बारामती, ३१ जुलै २०२० : सर्वत्र कोरोना संसर्गाने हाहा:कार माजवला असताना बारामती शहरातील प्रशासन भवनातील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाने मात्र सगळ्या नियमांना फाटा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामती शहरात रोज कोरोना रुग्ण सापडत आहेत तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील चिंताग्रस्त आहे.
शहरात प्रशासन नागरिकांना खबरदारीचे आवाहन करत आहे. गर्दी टाळा,मास्क वापरा, सॅनिटायजरचा वापर करा असे आवाहन करत आहे. मात्र सहाय्यक निबंधक कार्यालयाने या सगळ्या नियमांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या असल्याचे येथे आलेल्या नागरिकांनी सांगितले. सर्वत्र कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला असताना बारामती शहरात असणाऱ्या दोन सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय व आवारात मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कार्यालयात सध्या रोजच्या सरासरी पन्नास कागद होतात त्यामुळे एका कागदाला साधारण दहा लोक किंवा जेवढा मोठा सातबारा असेल तेवढे लोक वाढत आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते तर कार्यालयात सॅनिटायजर किंवा मास्क वापरात नसल्याचे दिसले खरेदीखतासाठी पुणे,सोलापूर,नगर,सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील लोक येत आहेत.
सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या संख्येवर बंधन असणे किंवा त्यांना सोशल डिस्टन्स पाळणे,मास्क वापराने,गर्दी न करणे असे नियम असायला हवेत मात्र कार्यालयात असणारे अवैद्य एजंटांकडून आर्थिक देवाण घेवाण होत असल्याने सगळे नियम धाब्यावर बसवले जात आहेत असे काही नागरिकांनी सांगितले.
येथे असणाऱ्या दोन रजिस्टर कार्यालयात साधारण रोजचे पन्नास दस्त होतात तर यासाठी येणाऱ्या लिहून घेणार, लिहून देणार, साक्षीदार,ओळख,व्यवहार करणारे एजंट यांची मोठी गर्दी होते आहे. एका ऑफिसला तर व्हेंटिलेशन नसल्याने आत मध्ये कोंदट वातावरण असते तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे.
खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांत वृद्ध मोठ्या प्रमाणात आहेत तर त्याची बसण्याची,पिण्याच्या पाण्याची,काही लिहायचे झाल्यास टेबलाची कसलीही सोय नाही सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या व्हरंड्यात, प्रवेशद्वाराच्या पायरीवर,कार्यालयाच्या बाहेर लोक घोळका करून बसलेले दिसतात.
यांच्यात कोणताही सोशल डिस्टन्स नाही,कार्यालयात सॅनिटायजर नाही,कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असून देखील शासकीय कार्यालयाने या पद्धतीने हलगर्जीपणा करणे योग्य आहे का ? असा संतप्त सवाल येथील लोकांनी केला आहे.बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांची थर्मामिटरने पाहणी करणे गरजेचे आहे.
कार्यालयात कोणीही बिनदिक्कत ये जा करत आहे.या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर तहसिलदार तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय कार्यालय आहे.जिथून तालुक्यातील लोकांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवाहन केले जाते मात्र त्यांच्या समोर पायदळी तुडवले जाणारे नियमांबाबत शासन हाताची घडी घालून बघत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी