पुणे, १२ जानेवारी २०२३ : राज्यात शिक्षण विभागातर्फे शिक्षकांची तपासणी केली गेली. काही दिवसांपूर्वी राज्यात ‘टीईटी’ पात्रतेसंदर्भात अनेक शिक्षकांना तपासणीला सामोरे जावे लागले. या तपासणीनंतर आता तपास सुरू झाला आहे तो म्हणजे शाळांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांचा. पुण्यात तीन शाळांवर बनावट ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र दाखविण्याचा गुन्हा दाखल केला गेला. तर युडायस प्रणालीत सर्व शाळांनी प्रमाणपत्र अपलोड करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
पुण्यातील एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शिवाजीनगर, नमो आर.आय.एम.एस. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तीन शाळांवर गुन्हा दाखल झाला असून, ६६६ शाळांची मान्यतेसंदर्भातील कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासली जाणार आहेत. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या अभ्यासक्रमांची संलग्न शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे अनिवार्य असते. पुण्यातील काही शाळा व संस्थाचालकांनी हीच ना-हरकत प्रमाणपत्रे बनावट पद्धतीने तयार केली.
खोटे शिक्के व सह्या वापरून केलेल्या बनावट प्रमाणपत्रांमुळे शिक्षण विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी करता दुसऱ्या शाळेचा इनवर्ड क्रमांक टाकून अज्ञात व्यक्तीकडून प्रमाणपत्र बनवून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उर्वरित ६६६ ‘सीबीएससी’ शाळांचा अहवाल तयार करून पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. तर आतापर्यंत झालेल्या चौकशीनुसार हा घोटाळा मोठा असून, यात अनेक मोठ्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.