अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे यांनी एकाला पोक्सो अंतर्गत दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी व ३६ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सचिन बाळू साळवे (वय- २६ रा. सुपा ता.पारनेर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
पारनेर तालुक्यातील पिडीत मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. यावेळी पिडीतावर आरोपी साळवे याने वेळोवेळी अत्याचार केले होते.
२९ जून २०१८ रोजी पिडीत मुलगी शाळेतून घरी न आल्याने तिच्या आईने सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सुपा पोलिसांनी पिडीत मुलीचा जबाब नोंदविला व आरोपीला अटक केली. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून मुलीची वैद्यकिय तपासणी केली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पठाण व पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने १५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील एस.के.पाटील व अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले.