मुंबई, २६ डिसेंबर २०२०: गेल्या काही दिवसांपासून मनसे ॲमेझॉन वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असावा यासाठी मागणी करत आहे. यासाठी मनसे आक्रमक झाली असून ॲमेझॉन च्या अनेक कार्यालयाची तोडफोड देखील केली आहे. याप्रकरणी ॲमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे यांना नोटीस देखील पाठवली. मात्र, यानंतर मनसे आणखीनच आक्रमक होऊन मुंबई व पुण्यातील ॲमेझॉन च्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
मनसे स्टाईलने काल केलेल्या खळखट्याक मुळे ॲमेझॉन काही पावलं मागे सरकले असे दिसत आहे. कारण, ॲमेझॉनच्या अधिकाऱ्याने मनसेसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ॲमेझॉन च्या निधी विभागाचे प्रमुख विकास चोप्रा आणि उपप्रमुख राहुल सुंदरम हे मनसे नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजले आहे.
दरम्यान मनसे ने काल पुण्यातील कोंढवा मधील ॲमेझॉन च्या कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील काचा, एलसीडी व इतर सामान अस्ताव्यस्त केले. यानंतर मुंबईतील चांदिवली आणि त्यानंतर साकीनाका या भागातील कार्यालयाची तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी ॲमेझॉन च्या कार्यालयात असलेले इंग्रजी भाषेतील बोर्ड काळ्या रंगाने रंगवून टाकले.
ॲमेझॉन च्या ॲप वर सध्या इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. पण, मराठीचा पर्याय देण्यास कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठी भाषेचा पर्याय नाही तोपर्यंत खळ्ळखटॅक सुरूच राहणार असा इशारा मनसेने दिला आहे. तसेच येणाऱ्या काळात आंदोलन आणखीन तिव्र करून पूर्ण महाराष्ट्रात ॲमेझॉन चा विरोध केला जाईल असे देखील मनसेने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे