नवी दिल्ली, दि. २३ जून २०२० : लॉकडाऊनमुळे मद्य उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मद्य व्यवसायच काय तर सर्वच राज्यांना मद्य व्यवसायातून मिळत असलेला महसूल देखील मिळणे बंद झाले होते. मद्य विक्री पासून मिळणारा महसूल राज्यांच्या उत्पन्नातील महत्त्वाचा घटक असतो. यामुळे राज्य सरकारांनी मद्य विक्रीला परवानगी दिली तर खरी पण मद्यविक्री दुकानांसमोर लागलेल्या रांगा वेगळ्याच धोक्याचा संकेत देऊ लागल्या होत्या. त्यामुळे सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीला देखील परवानगी दिली. जेणेकरून दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा कमी होतील. यासंदर्भात आणखीन एक चांगली बातमी समोर आली आहे ॲमेझॉन सुद्धा आता मद्य विक्री सेवा पुरवणार आहे.
आता सरकारने भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनला देखील ऑनलाईन मद्य विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्य विक्री व्यवसायाला देखील मोठा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर अलिबाबाच्या वेंचर बिग बास्केटलाही मद्य विक्रीची परवानगी मिळाली आहे. पण या दोन्ही कंपन्या पश्चिम बंगालमधील लोकांच्या घरात मद्य पोहचवतील.
सुमारे ९ कोटी लोकसंख्या असलेले पश्चिम बंगाल हे चौथे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. ॲमेझॉनने पश्चिम बंगाल सरकारबरोबर सामंजस्य करार केला आहे. राज्य सरकारनेही याबाबत नोटीस बजावली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या बातमीत लिहिले आहे की अॅमेझॉनने या संदर्भात कोणतेही विधान जाहीर करण्यास नकार दिला आहे. ॲमेझॉन कंपनीने पश्चिम बंगालमधील २.६ लाख कोटींच्या मद्य उद्योगात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी