अंबड MIDC प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा घाटनदेवीत रोखला, आज आयुक्तांसमवेत बैठक

नाशिक २८ जून २०२३: अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवून, त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच, असा इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिला.

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी दयावी, १९७३ ला औदयोगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतेवेळी उरलेल्या शेतकऱ्यांच्या जागेत वहीवाटीसाठी सोडलेल्या ४ ते ५ मीटर रस्त्यांचे क्षेत्र वाढवून १२ मीटर व १५ मीटरचे रस्ते मंजूर करण्यात यावे, पीएपी भूखंडापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्तांना जाचक अटी काढून भूखंड देण्यात यावे, या तीन प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.

सोमवारी सकाळी अंबड गावातून भर पावसात मुंबईकडे साहेबराव दातीर, रामदास दातीर, शरद फडोळ, मनोज दातीर, पांडूरंग दोदोसह शेकडो शेतकरी निघाले होते. ग्रामीण पोलिसांनी हा मोर्चा घाटनदेवी येथे अडवला. यावेळी ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुनिल भामरे यांनी, साहेबराव दातीर यांना त्यांच्या मागण्यांवर चर्चेसाठी आज मनपा आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केल्याचे, मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या सहीचे पत्र दिले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा