आंबेगाव स्मशानभूमी : शोकाकुल कुटुंबांना मनस्ताप, महापालिकेचे दुर्लक्ष

39

पुणे, २८ फेब्रुवारी २०२५ : पुणे शहराच्या दक्षिण उपनगरातील आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक येथील स्मशानभूमी सध्या समस्यांच्या गर्तेत सापडल्या आहेत. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबांना या ठिकाणी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडून या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

गैरसोयींचा डोंगर

आंबेगाव बुद्रुक आणि खुर्द या दोन्ही स्मशानभूमींमध्ये अनेक समस्या आहेत.

१ स्मशानभूमीत पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने शोकाकुल कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

२ अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांसाठी योग्य बैठक व्यवस्था नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागते.

३ स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असून, अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे.

४ रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दिव्यांची योग्य व्यवस्था नसल्याने अंधाराचा सामना करावा लागतो.

५ दशक्रिया विधीसाठी योग्य सोयीसुविधा नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.

नागरिकांची मागणी

आंबेगाव खुर्द स्मशानभूमीची दुरवस्था आणि समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या स्मशानभूमीत स्वच्छता, बैठक व्यवस्था, प्रसाधनगृह, वृक्षारोपण, दिवे यांसारख्या आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी सरपंच अनिल कोंढरे आणि ग्रामस्थ समीर चिंधे यांनी केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

या समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

तात्काळ उपाययोजना आवश्यक

आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव खुर्द येथील स्मशानभूमीतील समस्या गंभीर असून, महापालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. शोकाकुल कुटुंबांना मनस्ताप होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे