डबल इंजिन मिळाल्याने आंबेगावचा होईल विकास : दिलीप वळसे पाटील

मंचर, २० फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकत मंचरसह आंबेगाव तालुक्याच्या विकासाला आता डबल इंजिन मिळाल्याने विकास चांगला होईल असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. स्व. अरुण बाणखेले आणि स्व. भगवान दैणे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून तपनेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्धार आणि दीपमाळेचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी वळसे पाटील बोलत होते.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संजय थोरात, अविनाश रहाणे, डॉ. ताराचंद कराळे, सुनील बाणखेले, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, सतीश बाणखेले, जे. के. थोरात, रवींद्र करंजखेले आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मंचर येथील तपनेश्वर देवस्थानासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्द करून देऊ व हवी ती मदत करू, श्री तपनेश्वर मंदिरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असेही वळसे पाटील म्हणाले. मंचर शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणखी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे; तसेच कवयित्री शांता शेळके यांचा मंचर गावाशी असलेला ऋणानुबंध लक्षात घेता त्यांचे स्मारक मंचर शहरात व्हावे, अशी इच्छा वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा