अमित शाह घेणार राज ठाकरे यांची भेट? मुंबई दौऱ्यावेळी युतीची चर्चा?

मुंबई, २ सप्टेंबर २०२२: : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे.

अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने ते लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.

अमित शाह यावेळी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.
काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी भाजप मनसेच्या युतीची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा