महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई, २३ जुलै २०२३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, यांच्या गाड्यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आणि या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी, समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. आता या प्रकरणावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं तर त्यांनी टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचं सांगितल. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे.

राज साहेबांमुळे राज्यातील ६५ टोलनाके बंद पडले. आता माझ्यामुळे त्यात एकाची भर पडली, असं म्हणत अमित ठाकरे यांनी समृद्धी महामर्गावरील टोलनाका प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्गावरील नाशिक-सिन्नरजवळील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी अडवण्यात आली. त्यामुळे राग अनावर झाल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी त्या टोलनाक्याची तोडफोड केली.

प्रकरण काय-
रात्री शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन नाशिककडे परत जात असताना अमित ठाकरे यांना समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आलं होत, अमित ठाकरे ज्या गाडीमध्ये बसले होते त्या गाडीची नोंद मनसे पक्षाच्या नावाने आहे. समृद्धी महामार्गावर रात्री ९.२१ वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या गाडीचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. पण जसं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्यांच्या ताफ्याला सूट देऊन ताफा सोडला. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास मनसे संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. सध्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी टोलनाक्यावर दाखल झाले आहेत. पण अजून कोणतीही कायदेशीर तक्रार टोल प्रशासनाकडून पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही. काल रात्री ९ वाजता हा राडा झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मनसैनिकांचं हे आक्रमक रुप पाहून टोलनाक्यावरील कर्मचारी पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा