गोखळी येथे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार व शेतकरी मेळावा उत्साहात

फलटण, ११ फेब्रुवारी २०२३ : फलटण तालुक्यात पूर्वीपासून आपण विकासाचे राजकारण केले, पाणी आणण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आहेत; परंतु सध्या आपल्या तालुक्यात ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ ही अपप्रवृत्ती येत असून, माझे व हिंदुरावांचे संबंध होते; पण खासदारांचे व माझे या जन्मात कधीच जमणार नाही, अशी टीका खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

गोखळी (ता. फलटण) येथे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ व कापूस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम कारखान्याचे संचालक नितीन दादा शिंदे, संजय परकाळे, विकास काका वरे, पूर्व भागातील राष्ट्रवादीचे नेते बापूराव गावडे, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन प्रमोद झांबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फलटण पूर्व भागात सध्या कपाशीचे पीक जोमात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच नवनवीन बियाणांचा वापर केल्यास नक्कीच भरघोस उत्पन्न मिळेल, असे मत यावेळी शेतकरी मेळाव्यात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, तसेच खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर सध्या खासदार टीका करीत आहेत; परंतु ही टीका चुकीची आहे. कारण वीर धरण हे मुख्यतः पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पवार साहेब या तालुक्यातील जनतेची फसवणूक करणार नाहीत. जर त्यांना फसवणूक करायची होती तर त्यांनी हे धरणच होऊ दिले नसते अशी बोचरी टीकाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदारांचे नाव न घेता केली.

सध्या जिल्ह्यात व इतर तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील मंत्री, वरिष्ठ नेते फिरत आहेत. त्यांचा एकच हेतू आहे, की फक्त निवडणूक आणि त्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण पाहिजे ते कृत्य करायचे; परंतु या भागातील जनता सुज्ञ असून, ही जनता आमच्याच पाठीशी आहे, असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही श्रीराम सहकारी साखर कारखाना व साखरवाडी कारखान्याच्या माध्यमातून उसाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये यशस्वी झालो आहोत; तसेच या भागामध्ये कपाशीचे पीक येत असल्याने याचा आम्हाला आनंद होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना आम्ही नेहमीच सहकार्य करून मदत करू, असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मराठा समाजातील तरुणांनी घ्यावा; तसेच या भागातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून योग्य तो आर्थिक फायदा करून दिला जाईल, असे मत जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार दीपकराव चव्हाण, मनोज तात्या गावडे यांचीही यावेळी भाषणे झाली. गावच्या सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच सागर गावडे पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमास मनोज तात्या गावडे, जिल्हा परिषद सदस्य उषादेवी विश्वासराव गावडे, नंदकुमार गावडे मामा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राधेश्याम जाधव यांनी केले. आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर अभिजित जगताप यांनी आभार मानले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा