शेतकर्‍यांशी संबंधित ३ अध्यादेशांविरोधात आज संसदेबाहेर आंदोलन…

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: शेतकर्‍यांशी संबंधित तीन अध्यादेशांविरोधात निषेध सुरू झाला आहे. बऱ्याच शेतकरी संघटनांव्यतिरिक्त राजकीय पक्षदेखील या अध्यादेशांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. भारतीय किसान युनियनशी संबंधित मोठ्या संख्येनं शेतकरी बुधवारी या अध्यादेशाचा निषेध करणार आहेत. तर अकाली दलही त्याविरोधात मतदान करू शकतो.

भारतीय शेतकरी संघटनेचे नेते गुरनाम सिंह म्हणाले की, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी कृषी क्षेत्राशी संबंधित ३ विधेयकाच्या निषेधार्थ बुधवारी संसदेबाहेर धरणे आंदोलन करतील.

केवळ शेतकरी संघटनाच नाही तर मोदी सरकारचे मित्रपक्षदेखील याविरोधात उभे राहिले आहेत. असं म्हटलं जात आहे की पंजाबमधील जुना भाजपा सहयोगी शिरोमणी अकाली दल अध्यादेशामुळं नाराज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अकाली दल बुधवारी या अध्यादेशाच्या विरोधात मतदान करू शकतो.

यापूर्वी डाव्या पक्षांच्या सदस्यांनी ‘शेतकरी विरोधी धोरणे’ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी संसदेच्या आवारात धरणे आंदोलन केलं. डाव्या खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केलं आणि अध्यादेशांद्वारे केंद्राकडून आणलेली ‘शेतकरी विरोधी धोरणं’ मागे घेण्याची मागणी केलीय.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी तीन बिलं पास केली. यात कृषि उत्पादक व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुलभता) अध्यादेश, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अध्यादेश, किंमत विमा व शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) करार अध्यादेश २०२० ही बिलं मंजूर केली. तीन अध्यादेश आल्यापासून शेतकरी सातत्यानं विरोध करीत आहेत. ही बिलं लवकरच पास करण्याची तयारी सरकार करीत आहे. पण, केवळ विरोधकच नाही तर भाजपचे मित्रपक्ष देखील या बिलांच्या विरोधात उभे राहिलेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा