शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

मुंबई, ८ डिसेंबर २०२०: केंद्र सरकारनं प्रसारित केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या एक-दीड महिन्यांपासून विरोध करत आहेत. यासाठी सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये आत्तापर्यंत पाच वेळा चर्चादेखील झाल्या आहेत. गेल्या बारा दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत आणि आज शेतकरी संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. देशभरात भारत बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान शरद पवार उद्या अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत व नवीन शेतकरी कायद्याचा विरोध करीत आहेत. उद्या शेतकरी आणि सरकारमध्येही चर्चा होणार आहे त्याचबरोबर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी पवारांसोबत सीताराम येचुरी आणि डी. राजा असतील अशी माहिती मिळत आहे.

एका वृत्तवाहिनीनं शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी याबाबत सांगितलं. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत १०० टक्के मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा