मुंबई, ३ मार्च २०२३ : राजधानी मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गर्दीबद्दल प्रवाशांना साधारणपणे माहिती असते. लोकलमध्ये एवढी गर्दी असते की, लोकांना पाय ठेवायलाही जागा मिळणे कठीण झाले आहे. हीच गर्दी टाळण्यासाठी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे ६५ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी गुरुवारी प्रवासादरम्यान सामानाच्या डब्यात चढले; परंतु कल्याण आणि टिटवाळा येथे सहप्रवाशासोबत बाचाबाची झाली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून कल्याण ‘जीआरपी’च्या ताब्यात दिले.
बबन हांडे असे मृताचे नाव असून, ते कल्याणजवळील आंबिवली परिसरात राहतात. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिस प्रवाशांची चौकशी करीत आहेत. कल्याण जीआरपीने सांगितले की, वादानंतर झालेल्या हाणामारीत संशयिताने हांडे यांना धक्काबुक्की केली. धक्का इतका जोरदार होता की, बबन हांडे ट्रेनमधील कोणत्यातरी कठीण वस्तूवर आढळून खाली पडले आणि दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
‘जीआरपी’ने त्यांचा मृतदेह कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला. एका पथकाने आंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, तेथे त्यांना मृताचे नाव कळले. कल्याण ‘जीआरपी’चे वरिष्ठ निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, आतापर्यंत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे हल्ल्यामागील नेमके कारण समजणे कठीण असल्याने आम्ही कोचमधील इतर प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
कल्याण रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे त्यांनी काही प्रत्यक्षदर्शींना शोधून काढले असून, त्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे ‘जीआरपी’च्या सूत्रांनी सांगितले.
मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी ते मुंबई पोर्ट ट्रस्टमधून निवृत्त झाले. मृताच्या मुलाने सांगितले की, ‘मला विश्वासच बसत नाही की कोणी एखाद्या वृद्ध व्यक्तीला ट्रेनमध्ये कसे मारेल. पोलिसांनी आरोपीला अटक करावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे मुलाने म्हटले आहे. पोलिस उपायुक्त मनोज पाटील म्हणाले, ‘आमची टीम घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या आणखी काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचा प्रयत्न करीत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड