ठाणे, २४ मार्च २०२३ : एकीकडं कोरोनाने पुन्हा जोर पकडलाय, तर दुसरीकडं इन्फ्लूएंझा अर्थात एच३एन२नेही कहर सुरू केलाय. गुरुवारी (२३ मार्च) महाराष्ट्रातील ठाण्यात एच३एन२ मुळं एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. रुग्णाचं वय ७९ वर्षे आहे. वृद्ध रुग्णाला एच३एन२ तसंच कोरोना होता. ठाण्यातील एच३एन२ मुळं मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. ठाण्यातील ग्रामीण भागात कोविडमुळं एकाचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झालाय.
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात कोविडचा प्रभाव जवळपास संपला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्याप्रमाणेच ठाण्यातही कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढू लागलाय. सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २८९ आहे. त्यापैकी १८७ प्रकरणे केवळ ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. मात्र यातील केवळ ११ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली ही दिलासादायक बाब आहे. उर्वरित रुग्णांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय.
महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा जोर पकडलाय. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब स्पष्ट केलीय. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं की, आता भारतात दररोज सुमारे ९६६ कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ०.०९ टक्के असलेला कोरोना पॉझिटिव्ह दर आता १ टक्क्यांवर पोहोचलाय. म्हणजे आता काळजी घेण्याची गरज आहे.
बुधवारी कोरोना आणि एच३एन२ चा वाढता धोका पाहता पीएम मोदींनीही एक महत्त्वाची बैठक घेतली. ज्यात आठ राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल आणि राजस्थान यांचा समावेश आहे. याशिवाय गर्दीपासून अंतर राखण्याचा सल्ला दिला जातोय. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. पौष्टिक आहार घेण्याचा आणि पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातोय. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधे घेण्यास मनाई आहे. या सूचनांचं पालन केल्यास हा वाढता धोका बऱ्याच अंशी टळू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड