वॉशिंग्टन, १० ऑक्टोंबर २०२२ : जगभरात सर्वत्र इलेक्ट्रीक मोटारींच्या (Electric Car) वापराला प्रोत्साहन दिले जात असतानाच आता या मोटारी केवळ पाच मिनिटांतच चार्ज होतील, असे तंत्रज्ञान अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने (NASA) तयार केले आहे. अर्थात, हे तंत्रज्ञान त्यांनी भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी तयार केले असले तरी त्याचा वापर मोटारी चार्ज करण्यासाठीही केला जाऊ शकतो. यामुळे या वाहनांचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढेल, असा विश्वास ‘नासा’ने व्यक्त केला आहे.
अमेरिकेतील पर्ड्यु विद्यापीठातील संशोधकांनी ‘फ्लो बॉइलिंग अँड कंडेन्सेशन’ FBCE हा प्रयोग विकसित केला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात दोन टप्प्यांत द्रव पदार्थाचे वहन आणि उष्णतेचे रूपांतर करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. ‘सबकूल्ड फ्लो बॉइलिंग’ या नव्या तंत्रज्ञानामुळे उष्णतेचे रूपांतर अधिक परिणामकारक पद्धतीने शक्य असून भविष्यात अवकाशात तापमान नियंत्रणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. याच तंत्रज्ञानाचा पृथ्वीवरही वापर होऊ शकतो. इलेक्ट्रिक मोटारीमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर शक्य आहे, असा संशोधकांचा दावा आहे.
चार्जिंगसाठी लागणारा वेळ
इलेक्ट्रिक मोटारी चार्ज होण्यासाठी सध्या वीस मिनिटे ते एक तास इतका वेळ लागतो. काही मोटारींसाठी हा वेळ याहून अधिक आहे. चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि चार्जिंग स्टेशनची कमी संख्या या इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक प्रसार होण्यातील मोठा अडथळा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
चार्जिंगसाठीचा वेळ पाच मिनिटांवर आणण्यासाठी चार्जिंग यंत्रणेला १४०० ॲम्पियरचा विद्युतप्रवाह मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या अत्याधुनिक चार्जरला केवळ ५२० ॲम्पियरचा वीजेचा पुरवठा होतो. इतर अनेक चार्जरला तर १५० हून कमी ॲम्पियर वीजेचा पुरवठा होतो. चार्जरला १४०० ॲम्पियरचा वीजपुरवठा झाल्यास अधिक तापमान उष्णता निर्माण होऊन वेगाने चार्जिंग होऊ शकते. पण त्यासाठी तापमानावर नियंत्रण ठेवणारी अत्याधुनिक यंत्रणाही पाहिजे.
तंत्रज्ञानाचा वापर
नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोटारींच्या चार्जिंगसाठी होऊ शकतो, हे संशोधकांना (FBCE) प्रयोगातून लक्षात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, डायइलेक्ट्रिक लिक्विड कूलंट हे चार्जिंग केबलमधून सोडले जाते. येथे विद्युत वहन करणाऱ्या कंडक्टरद्वारे निर्माण झालेली उष्णता हे कूलंट शोषून घेते. त्यामुळे सुमारे २४.२२ किलोवॉट ऊर्जा काढून टाकल्याने सध्याच्या चार्जरपेक्षा ४.६ पट अधिक वेगाने वीजेचे वहन होते. यामुळे चार्जिंग केबल २४०० ॲम्पियरचा वीजपुरवठा करू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे