वंदे भारत मिशन एक अनुभव

अरे कधी येणार आहेस भारतात, काळजी घे परदेशात..!!! सततच्या या प्रश्नांनी कोरोनाचे संकट माझ्या पुढ्यात अगदी आ वासून बसले आहे असे जाणवू लागले, अर्थात त्यामागचे प्रेम, काळजी सतत जाणवत होती.
भारत सरकारच्या परदेशात अडकलेल्या वंदे भारत अभियानाला रेजिस्ट्रेशन केले व भारतात परतण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि वेध लागले मायभूमीत परतण्याचे.!!
कॅनडा मधील भारतीय दूतावासात चौकशी करून नावनोंदणीची खात्री करून घेतली व एअर इंडियाचे विमान तिकीट सर्व कोरोना बाबींची पुर्तता करुन आरक्षित केले, एक सुटकेचा निःश्वास टाकला. परंतू वारंवार बदलत चाललेले विमानसेवेचे वेळापत्रक अजूनही एक पाऊल कॅनडा मध्ये ठेवत होते.

सगळे जग या महाभयंकर कोरोनाने ग्रासले असताना भारत सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबवलेले हे अभियान निश्चितच अभिमानस्पद आहे परंतू भारतात परतल्यावरचा अनुभव थोडा चिंतेचे वातावरण निर्माण करते. अर्थात कॅनडामधील आंतरराज्य विमानसेवेत पण एवढी काळजी घेतली गेली नाही, कुठेही मेडिकल टेस्ट घेतली नाही फक्त टेंपरेचर चेक केले गेले. सोशल डिस्टंसिंगचे नियम काही प्रमाणात पाळले गेले. टोरोंटो दिल्ली असे विमान होते, परंतू कॅनडा विमानतळावर टेंपरेचर चेक व्यतिरिक्त काहीही नियमांची पूर्तता करण्यात आली नाही, प्रवासी मास्क लावून नियमांची अंमलबजावणी करताना दिसून आले, परदेशी शिस्तबद्ध पद्धतीचे सावट विमानात बसेपर्यंत होते, विमानात शिरल्यावर प्रवाशांच्या भाऊगर्दीला, सामान ठेवण्याच्या गडबडीला, त्या अरुंद वाटेवर ठाण मांडून उभे राहण्याच्या सवयीला अजूनच प्रोत्साहन मिळाले व सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला, इतक्या वर्षांच्या परदेशी प्रवासातील अनुभव म्हणजे भारतीय जेव्हा परदेशी धरतीवर असतात तेव्हा सगळे नियम न सांगता आत्मसात करतात व पाळतात परंतू ज्या क्षणी भारतात जाण्यासाठीच्या विमानात प्रवेश करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या आतील मातृभूमीचे प्रेम जरा जास्तच उफाळून येते व भारतीय बाणा जागा होतो परिणामी नियम संपतात.

एअर इंडियाच्या विमानात अतिशय चांगल्या पद्धतीने नियमांची पुर्तता केली गेली यात सेफ्टी किट (मास्क, सैनिटायझर , फेस शिल्ड), पॅक फूड याचा समावेश होता व ते प्रत्येकाच्या जागेवर ठेवण्यात आले होते. एअर होस्टेसचा पेहराव, कोरोना वॉरियर्सच्या पेहरावाशी जुळता होता त्यामुळे काही प्रवाशांच्या मनातील हवाई सुंदरी यावेळी मात्र निसटून गेली.

प्रवासी, बाथरूमचा वापर कमीत कमी होईल, कुठेही स्पर्श झाल्यास सैनिटायझरचा त्वरित वापर करणे, याची काळजी घेत होते, ३ पैकी मधली सीट रिकामी ठेवण्यात आली होती. तरी देखील विमान त्याअर्थी पूर्ण भरले होते.
दिल्लीला वेळेआधीच सुरक्षित पोहचलो, आता कधी एकदा घरी जातोय याची उत्सुकता ताणली गेली होती. दिल्ली विमानतळावर आखून दिलेल्या काही वैद्यकीय बाबींची पूर्तता केली जाते व परिस्थितीनुसार होम किंवा हॉटेल क्वारंटाईन करण्यात येते असे ऐकले होते. या सर्व गोष्टींना १-२ तास वेळ निश्चित धरून काहींनी पुढच्या विमानासाठी तिकीट आरक्षित केले होते.

आमचे विमान पोहचल्यावर , आधीच काही विमाने आल्यामुळे झालेली गर्दी लक्षात घेता पुढचे दीड तास विमानातच बसून राहावे लागले व प्रवाशांची घरच्या ओढीला दीड तासाचा लगाम लागला गेला. लवकरच बाहेर पडू असे वाटले, बाहेर आल्यावर विमानातील प्रवाशांचा एक ग्रुप करण्यात आला व त्याला एक ग्रुप लीडर देण्यात आला व त्याच्या सूचनेनुसार आधी एकत्र बाजूला बसवून नावनोंदणी करण्यात आली व प्रत्येकाचे टेंपरेचर घेण्यात आले, आता प्रस्थान इमीग्रेशनला होते तेथील कर्मचाऱ्याच्या वेळेनुसार १० मिनिटांच्या पूर्ततेला ४० मिनिटे लागली, पुढे परत एकदा आमच्या ग्रुप बी वर्गासमवेत रांगेत उभे राहिलो, सगळ्यांच्या बॅगा एकत्र विमानानुसार बाजूला आणून ठेवण्यात आल्या होत्या त्यातील माझी बॅग लावलेल्या सांकेतिक खुणेमुळे त्या ढिगाऱ्यातून ओळखणे सोपे झाले. काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर परत एकदा आमचा वर्ग भरला (कोणीही ग्रुप सोडून दुसरीकडे जाऊ नये याच्या पूर्वसूचना लीडर कडून देण्यात आल्या होत्या) व आता फक्त कोरोना मेडिकल टेस्ट आणि मग घरी असाच कार्यक्रम राहिला होता. लवकरच आमचा ग्रुप नुसार नंबर लागेल असे सांगण्यात आले, आशेवर राहून पुढचा दीड तास गेला प्रवासी कंटाळले व लिडरचा शोध सुरु झाला. केवळ थांबा आम्हाला नियमांचे पालन करू द्या या सबबीवर थांबवण्यात आले, गर्दी वाढत होती व काळजी ही.

अखेर शेवटच्या टप्प्याची प्रतीक्षा संपली व आम्हाला परत एकदा नवीन जागी नेण्यात आले, परत एकदा वाट पाहणे !! लोक कंटाळली व उद्रेक सुरु झाला, बाचाबाची झाली पण वाट बघण्याशिवाय काहीही करता आले नाही. परत २ तास प्रतीक्षेत गेले, भुका लागलेल्या पण जागा सोडून जाता येत नव्हते.
परत एकदा रांग लागली , शाळा आम्ही अनुभवत होतो.
आता मेडिकल टेस्ट होईल व अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कुठे राहायचे ठरण्यात येईल असे सांगण्यात आले. आम्ही कोरोना टेस्ट साठी मेडिकल कक्षात उभे होतो पण अक्षरशः भाजी मंडई भरली होती व सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता, पोलिसांना गर्दीला आवरणे अवघड झाले होते, बरोबरच सामान बाजूला ठेवा असे सांगण्यात आले होते व त्या ढिगाऱ्यात सगळे अस्ताव्यस्त पडलेले आढळले , जो तो आपले सामान काढण्याच्या नादात दुसऱ्यांच्या बॅगा आडव्या करत होते , वास्तविक प्रत्येक बॅग सॅनिटाईज करणे अपेक्षित होते पण.. गर्दीत आपल्या रांगेत खेटून उभे राहावे लागत होते, जरी सर्व सेफ्टी अलंकार घातलेले असले तरी चेहऱ्यावर भीती जाणवत होती. मेडिकल टेस्ट न होता फक्त टेबलावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्याकडून फक्त कागदांची पूर्तता होत होती व मेडिकल टेस्ट नाही असे सांगण्यात आले.

एकदाचे माझे नाव, त्या चुरगाळलेल्या गिचमडीच्या वहीत अगम्य अक्षरांत नोंदवले गेले व दुसऱ्या अधिकाऱ्याच्या पुढ्यात उभे राहिलो. यावेळी आमच्या सुदैवाने ३० मिनिटांत नंबर लागला व ही रांग फक्त आपातकालीन सेवेसाठी असल्याचे टेबलपाशी आल्यावर सांगण्यात आले. (कुठेही सूचना अथवा नियमांची पाटी नव्हती) याव्यतिरिक्त बाकीच्यांना कंपल्सरी हॉटेल क्वारंटाईन व्हावेच लागणार होते. अनपेक्षित होते कारण लोकांचे पुढेच्या विमानची तिकीटे आरक्षित होते जे रद्द करण्यात आले , आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच. प्रवाशात नाराजीचा सूर होता या सर्व ढिसाळ कारभाराचा, पण गत्यंतर नव्हते.
कर्मचाऱ्यांचा सूर मात्र प्रवाशांना हॉटेल निवडून देण्याकडेच जास्त होता जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकडे गेला.

संपूर्ण १ ते दीड तासाची प्रक्रिया ७-८ तासांच्या कालावधीनंतर संपली , एकंदरीत काय कागदावरच्या गोष्टी व प्रत्यक्षात आलेला अनुभव यात बरीच तफावत आढळली , या सर्व प्रकारात कोरोना सुरक्षितेसाठी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे हे मात्र नक्की !!

मंदार रेडे – एक प्रवासी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा