गोल पोस्ट इतर प्रेम प्रकरणातून तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यातील घटना

प्रेम प्रकरणातून तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यातील घटना

पुणे, दिनांक २ ऑक्टोबर २०२२ : एका तरुणाने प्रेमभंगातून पुणे रेल्वे स्थानकामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे स्टेशनमध्ये एक नंबर प्लॅटफार्मवर तरुणाने उभ्या असलेल्या गोरखपुर एक्सप्रेस वर चढून रेल्वेची ओव्हरहेड वायर हाताने पकडली. यावेळी स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाला. वीजेचा जोरदार धक्का लागल्यानंतर तरुण उडून प्लॅटफॉर्मवर फेकला गेला. त्याला पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

गोवर्धन मल्ला वय ३३ वर्षे रा. कटक, ओरिसा असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. कामानिमित्त पुण्यात आलेला मल्ला हा पुण्यातील खेड परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. घटनेनंतर त्याच्याकडे विशाखापट्टणम गाडीचे तिकीट मिळाले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन येथील वाडिया कॉलेज जवळील सिग्नलवर गोरखपुर एक्सप्रेस थांबली होती. त्यावेळी मल्ला हा गाडीवर गेला. तो रेल्वे गाडीवरुन चालत आला. गोरखपुर एक्सप्रेस ही पुणे स्टेशन प्लॅटफार्म क्रमांक एक येथे आल्यानंतर तो रेल्वेवर चालत होता. त्यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तारेला हात लावताच मोठा स्फोट होऊन तो उडून प्लॅटफार्म वर पडला.

घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून तो गंभीररीत्या पूर्णपणे भाजला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्रेम भंगातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version