नवी दिल्ली, ४ मार्च २०२१: महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ नोंदविली जात आहे. गेल्या २४ तासांत नोंदवलेल्या नवीन रुग्णांपैकी ८५.९५% रुग्ण या राज्यातील आहेत.
गेल्या २४ तासांत १४,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक ७,८६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये २,९३८ तर पंजाबमध्ये ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
आठवड्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये नवीन रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.
एकट्या महारष्ट्रात आठवड्याभरात १६,०१२ रुग्णांची वाढ झाली आहे.
टक्केवारीनुसार पंजाबमध्ये आठवड्यात ७१.५% (१,७८३ रुग्ण) रुग्णांची वाढ झाली आहे.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत असलेल्या आणि दररोज नवीन कोविड रुग्णांची नोंद होणाऱ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत केंद्र सरकार सतत संपर्कात आहे. कोविड -१९ च्या सध्या वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणायला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके रवाना केली आहेत. या तीन सदस्यीय पथकाचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयात सह-सचिव स्तरावरील अधिकारी करतील. हे पथक कोविड-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्येची कारणे शोधतील आणि कोविड-१९ वर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागांशी समन्वय साधतील.
भारतातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज १,७०,१२६ वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या १.५३% आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे