पुणे, १ डिसेंबर २०२०: आनंदवन म्हणजे “बाबा आमटे”असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था त्यांनी उभी केली. समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई तसंच आजही काही लोक ते अंधश्रद्धेमुळे मानतात. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई
आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी (तुळशीराम) पाहिला आणि त्यांच्या मनात विचार आला याच्या जागी मी आसतो तर, मग ते त्याला घरी घेऊन आले. गांधींनी ज्यांना गौरविले होते अश्या अभयसाधकाला अर्थात बाबा आमटेंना त्या कुष्ठरोग्याला पाहून भीती वाटली. त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण झाले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन आज हजारो कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
आज बाबा आमटेंच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या मुलांनी डाॅ विकास आमटे आणि डाॅ प्रकाश आमटे यांनी पुढे अविरत चालू ठेवला आणि काळानुरुप तिसर्या पिढीने ही बाबांच्या या विचारांना आणि कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी उभे राहीले. डाॅ शितल आमटे करजगी म्हणजेच तिसर्या पिढीतील सदस्य.
कोण होत्या डाॅ शितल आमटे?
डाॅ शीतल आमटे या एक भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ञ, अपंगत्व तज्ञ आणि सामाजिक उद्योजक होत्या. तसेच महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बिनधास्त संस्थेच्या मंडळाच्या सदस्य होत्या. ज्यांचे कुष्ठरोगापासून वंचित असलेल्यांना मदत करण्यावर जास्त लक्ष केंद्रित आसत. भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.
सध्या त्या आनंदवनला देशातील आदर्श स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी देखील काम करत होत्या. या अंतर्गत आनंदवनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य अशा अनेक घटकांचा यात विचार करण्यात येत होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जानेवारी २०१६ मध्ये त्यांना ‘यंग ग्लोबल लिटर २०१६’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानंतर त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या तज्ज्ञांच्या पॅनलचं सदस्यत्व देखील देण्यात आलं होतं. शीतल आमटे संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड इनोव्हेशन ऑर्गनायझेनच्या समन्वयक म्हणूनही काम करत होत्या. त्यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामासाठीच २०१६ चा रोटरी व्हॅकेशनल इक्सलन्स पुरस्कारही भेटला होता. त्या इंक फेलोवशिपच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्या एक्स्प्रेस हेल्थ पुरस्कार आणि एक्स्प्रेस हेल्थकेअर पुरस्कार निवड समितीच्याही सदस्य होत्या. लॅन्सेट आयोगाने त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (दिल्ली) या संस्थेच्या त्या सल्लागार होत्या.
बाबांच्या आनंदवनात” वादाची ठिणगी…..
डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांनाही जबाबदारी देण्यात आली. आनंदवनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असं नवं पद तयार करुन त्यावर शीतल आमटे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्याचे पती गौतम कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक पदी नियुक्त करण्यात आलं. गौतम कराजगी यांनी आपल्या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामानुसार आनंदवनातही अनेक मोठे बदल केले आणि येथेच वादाची ठिणगी पडली.
आनंदवनात अनेक वर्षांपासून काम करणारे आणि डॉ. विकास आमटे यांचे जवळचे सहकारी राजू सौसागडे यांनी शीतल आमटे आणि गौतम कराजगी यांच्यावर मनमानी कारभाराचा आणि आपला छळ केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल केली. बाबा आमटे यांचे सहकारी शंकरदादा जुमडे यांचा मुलगा विजय जुमडे यांनीही या नव्या प्रशासनावर गंभीर आरोप केले.
डाॅ शीतल आणि आमटे कुटुंबाचे आरोप आणि स्पष्टीकरण……
एका आठवड्यापूर्वी त्यांनी सीईओ असलेल्या त्याच संस्थेत आर्थिक अनियमिततेचा आरोप करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.तथापि, त्यांनी अवघ्या काही तासांत व्हिडिओ हटविला.तर बीबीसी शी बोलताना त्यांनी सांगितले की व्हिडिओ हा काढून टाकण्यास त्यांना भाग पाडले.
बाबा आमटे यांचे पुत्र तसेच त्यांचा हा वारसा पुढे नेणारे विकास आणि प्रकाश आमटे तसेच या दोघांच्या पत्नी भारती आणि मंदाकिनी आमटे यांच्या वतीने हे आरोप फेटाळून लावण्यात आले. यामध्ये त्यांनी शितल यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. शीतल विकास आमटे यांची मुलगी होती. आमटे कुटुंबानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,’महारोगी सेवा समिती, वरोरा ही देशातील एक मोठी सामाजिक सेवा संस्था आहे. यानं वंचितांच्या विकासास दिशा व प्रेरणा दिली आहे. येथे कोट्यवधी समाजसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. ‘आमटेंच्या तीन पिढ्या या कामात व्यस्त आहेत. शीतल आमटे करजगी यांनी महारोगी सेवा समितीच्या काम, ट्रस्टी व कामगारांविषयी अनुचित वक्तव्य केलं आहे. शितल बऱ्याच काळापासून तणाव आणि डिप्रेशनचा सामना करत होत्या. त्यांच्या सर्व टिप्पण्या निराधार आहेत. शीतल यांच्या आरोपामुळं कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आमटे कुटुंब हे परस्पर चर्चेनंतर हे विधान जारी करत आहे. “आम्हाला आमच्या सर्व लाभार्थी, कामगार आणि मित्र पक्षांना हे आश्वासन द्यायचं आहे की, संस्थेचं कार्य गेल्या सात दशकांच्या परंपरेचं पालन करत राहील आणि लोकांना कोणत्याही चुकीच्या प्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करत आहोत.”असं म्हणण्यात आलं. तसेच शीतल आमटे या सध्या मानसिक ताण आणि नैराश्याचा सामना करत असल्याचीही कबुली आमटे कुटुंबीयांनी दिली.
कुटुंबीयांच्या या निवेदनानंतर शीतल आणि गौतम कराजगी यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, ‘आजोबा बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी आम्हाला जे शिकवलं त्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. योग्य वेळी आम्ही या प्रकरणात तपशीलवार निवेदन देऊ. आम्ही लोकांना आमच्यावर विश्वास ठेवण्याची विनंती करतो.’
सोमवारी पहाटे डाॅ शितल आमटे यांचे निधन झाले. त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. ज्या नंतर संपूर्ण जगात सामाजिक कार्यात आदराने ज्या आमटे कुटुंबियांचे नाव घेतले जाते तिथे पुन्हा चर्चा सुरू झाली. असंख्य असे प्रश्न डाॅ शितल आमटे यांनी आपल्या मागे लोकांसाठी आणि आमटे कुटुंबासाठी सोडून गेल्या. तर त्यांनी त्यांच्या आत्महत्ये पुर्वी एक ट्विट करून फोटो शेयर केला ज्या मधे त्यांचे नाव देखील आहे. तर त्याला कॅप्शन मधे त्यांनी “वाॅर अँड स्पीस” अर्थात “युद्ध आणि शांतता”असे लिहले होते. ज्या मुळे चर्चेला उधाण तर आले आणि राहिले “आमटे कुटुंब”……..
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव