अंगणवाडीच्या बालकांना मिळणार घरपोच आहाराच्या वस्तू : नागमवाड

बारामती,दि. २६ एप्रिल २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ’एकात्मिक बालविकास सेवा योजना, बारामती’ यांच्या वतीने आंगणवाडीच्या बालकांना सकस आहार मिळण्यासाठी घरपोच वस्तू देण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी दिली.

आंगणवाडी केंद्रात बालकांना दिला जाणारा आहार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे थांबविण्यात आला होता. परंतु संचारबंदीच्या काळात सर्व अंगणवाडीच्या बालकांना पोषण आहार मिळावा, या हेतूने बालकांना आता घरपोच आहाराच्या वस्तू मिळणार आहेत. बारामती तालुक्यात प्रकल्प १ व प्रकल्प २ अंतर्गत एकुण ४१६ आंगणवाडी केंद्र असून इथल्या एकूण १६ हजार ९४९ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तांदूळ ३ किलो १०० ग्रॅम, चणा डाळ १ किलो ५०० ग्रॅम, मसूर डाळ १ किलो ४०० ग्रॅम, मिरची पावडर २०० ग्रॅम, हळद पावडर २०० ग्रॅम, मीठ ४०० ग्रॅम, सोयाबीन तेल ५०० ग्रॅम अशा एका महिन्यासाठीच्या सर्व वस्तू आंगणवाडी सेविकांमार्फत ३ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांच्या घरी घरपोच देण्यात येणार आहेत. या वस्तू दिल्यानंतर आंगणवाडी सेविका आरोग्यदायी पाककृतींसाठी या बालकांच्या पालकांना माहिती देऊन आहाराची पहाणी देखील करणार आहेत. या बालकांना आहार देताना पालकांनी फोटो काढून अंगणवाडी सेविकांना पाठवायचा आहे.

३ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार मिळणे अत्यंत गरजेचे असल्या कारणाने सेविकांमार्फत बालकांना घरपोच आहाराचे साहित्य दिले जात आहे. यासाठी सर्व नागरिकांनी आंगणवाडी सेविकांना कुटुंब सर्वेक्षण करतांना सहकार्य करावे, तसेच प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या बालकांच्या सुढ्रुड, बौद्धिक, शारीरिक, व मानसिक विकासासाठी आपल्याला घरपोच मिळालेल्या वस्तूपासून बालकांना घराच्या घरी दररोज सकस आहार द्यावा असे आवाहन बारामती तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी केले आहे.

घरोघरी आरोग्य तपासणी
बारामती तालुक्यात अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत प्रत्येक कुटुंबात जाऊन सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. या सर्वेक्षणा दरम्यान कुटुंबातील एखाद्या सदस्याला खोकला, सर्दी, ताप असल्यास सदर माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा