गोल पोस्ट गुन्हा प्रियकाराचा संताप, प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळले, २४ तासात ठोकल्या बेड्या

प्रियकाराचा संताप, प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळले, २४ तासात ठोकल्या बेड्या

बीड, १६ नोव्हेंबर २०२०: प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय. यामध्ये तरुणीचा मृत्यू झालाय. ही तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही पुण्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघेही पुण्याहून नांदेडला परतत होते. त्यावेळी बीडमधल्या येळंब घाटात या तरुणानं गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने प्रेयसीच्या अंगावर एसिड टाकलं आणि तिथून तो पळून गेला. पीडित तरुणीचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली होती. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर २४ तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण:

दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल १२ तास रस्त्याच्या बाजूला पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version