कंगनाची ड्रग्स संबंधी चौकशी करण्याचे अनिल देशमुखांचे आदेश

मुंबई, ११ सप्टेंबर २०२०: राज्य सरकार विरोधात व मुंबई पोलिसांविरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने केल्यानं कंगना आपल्याच अडचणीत वाढ करून घेत असल्याचं गेल्या काही दिवसात दिसून आलं आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वीच कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेनं कारवाई करत बुलडोझर फिरवला होता. त्यानंतर २०१८ चं व प्रलंबित फ्लॅट प्रकरण देखील पालिकेनं आता सुरू केलं आणि आता ड्रग्स विषयी तपासणी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत.

कार्यालयावरील कारवाई नंतर आता कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा – अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाला होता अध्ययन…

अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे. “आपण हॅश ट्राय केलं होतं, पण ते आवडलं नव्हतं, त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं” असंही अध्ययनने म्हटलं होतं.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने कंगनाची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना आमदार सुनिल प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत,

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा