मुंबई, २ सप्टेंबर २०२१: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसूलीचा आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख रडारवर आले आहेत. त्यानंतर आता त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेत त्यांची चौकशी केली आहे. जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांच्या वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण १० ते १२ जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय.
अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलेलं नाही. चतुर्वेदी यांच्यासह देशमुखांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ समन्स बजावले आहे, पण त्यांनी वकीलामार्फत उत्तर दिले आहे. त्यांनी एकदाही ईडीकडे हजेरी लावलेली नाही.
नवाब मलिकांचा केंद्र सरकारवर घणाघात
“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कन्या, जावई आणि वकील त्यांच्या वरळीतील सुखदा या इमारतीतून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवून देशमुखांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना १० ते १२ जणांनी ताब्यात घेतलं आहे. सोबत घेऊन गेले. कुठलीही माहिती त्या मुलीला देण्यात आली नाही. एकंदरीत जी कारवाई करण्यात आली आहे ती बेकायदेशीर आहे, कुठल्याही नियमांना धरुन नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की, या देशात कायद्याचं राज्य आहे का? की राज्यकर्त्यांचा नवीन कायदा या देशात लागू झालाय? याचा खुलासा सीबीआयने केला पाहिजे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे