अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याचं सत्रं सुरूच, काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा

मुंबई, १९ जुलै २०२१: अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती १६ जुलै रोजी समोर आली होती. मात्र ईडीने जप्त केलेल्या या मालमत्तांची सध्याची किंमत ही ३५० कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती नंतर समोर आली. याची चर्चा संपते न संपते तोच इडी ने पुन्हा एकदा नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. यामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याचं सत्रं सुरूच आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या तपासा अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचं वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरु आहे.

यापूर्वी १६ जुलै रोजी ईडीने वरळी येथील एक फ्लॅट (खरेदी किंमत १ कोटी ५४ लाख रुपये) तसेच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील ८ एकर ३० गुंठे जमीन जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचं आधी म्हटलं होतं. परंतु ही खरेदी किंमत असून या मालमत्तेची आजच्या बाजारभावानुसार किंमत तब्बल ३५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा