“EWSचा मराठा आरक्षणावर परिणाम होणार नाही” संभाजीराजे यांच्या प्रश्नाला अनिल परब यांचं उत्तर

मुंबई, २४ डिसेंबर २०२०: काही महिन्यापूर्वी कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत याविषयी सरकारला वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. त्यात आज संभाजीराजेंनी देखील सरकारवर संशय घेत टीका केली आहे. ते म्हणाले की, “आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. २५ जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. याला प्रत्युत्तर देताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं की, EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल परब यांनी मराठा आरक्षणावरील सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. या संघटनांनी एकत्र येवून निर्णय द्यायला हवा. EWS च्या मागणीसाठी काही विद्यार्थी कोर्टात जातायत व त्यांना ते द्यावं लागतेय. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही, तर गरीब घटकांसाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पड़त नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले संभाजी राजे

मराठा समाजाला बहुजन समाजापासून लांब ठेवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असल्यानं हे आपल्या लक्षात आल्याचं संभाजीराजे म्हणाले. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं सांगत आर्थिक दुर्बल घटक म्हणून कालच्या बैठकीत आरक्षण दिलं. मग सूपर न्यूमर पद्धतीनं ठरलेलं असताना अचानक EWSचा मुद्दा आला कुठून? असा प्रश्न संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा