शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण

अहमदनगर, २९ जानेवारी २०२१: सरकारकडे केलेल्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने ३० जानेवारीचे आंदोलन होणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार आता अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला सुरुवात करतील. अण्णा हजारे यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोना संसर्गाच्या भितीमुळे कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत गर्दी करू नये, ठिकठिकाणी अहिंसेच्या मार्गाने पाठिंबा देणारी आंदोलने करावीत, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे.

सध्या दिल्लीत शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यामुळे आता अण्णा हजारे यांनी आपल्या समर्थकांना आपापल्या शहरात आणि गावात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान अण्णा हजारेंनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेताना दिसत नाही. सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता उरलेली नाही. त्यामुळे मी येत्या ३० तारखेपासून उपोषणाला बसणार आहे.

मी फक्त राळेगणसिद्धी येथून उपोषण करणार आहे. मला समर्थन देऊ इच्छिणाऱ्यांनी आपापल्या गावातून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन करावे. अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे राळेगणसिद्धी येथे गर्दी करणे योग्य ठरणार नाही, असे आवाहनही अण्णांनी लोकांना केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा