अणेच्या यात्रेत भाविकांनी घेतला आमटी- भाकरीचा आस्वाद

बेल्हे : श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित यात्रोत्सवात अणे (ता.जुन्नर) येथे दोन दिवस लाखो भाविकांनी आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावर्षीच्या आमटीच्या निव्वळ मसाल्याचा खर्च जवळपास पाच लाख रुपये असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवार (दि. २७) आणि शनिवार (दि. २८) या दोन दिवसांत ३७ कढया आमटी आणि ५५ क्विंटल बाजरीच्या भाकरी भाविकांना महाप्रसाद म्हणून बनवण्यात आल्या होत्या.भाकरी बनवण्याचे काम अणे व पंचक्रोशीतील गावांतील महिलांनी केले.
अणे येथे श्री रंगदासस्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे श्री रंगदासस्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी सांगितले. येथील भक्तभवन इमारतीच्या तीनही मजल्यांवर आमटी-भाकरी महाप्रसादासाठी पंगतींची व्यवस्था करण्यात आली होती. वरच्या मजल्यांवर आमटी नेण्यासाठी स्वयंचलित लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती.
शनिवार (दि. २८) काल्याच्या कीर्तनाने यात्रोत्सवाची सांगता झाली. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून आळेफाटा पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या मदतीला परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, गणपत फुलवडे, बाळासाहेब खिलारी, धोंडिभाऊ पिंगट, श्रीप्रकाश बोरा, जयवंत घोडके यांसह लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा