पोपटाच्या सततच्या आवाजाने चिडून, शेजाऱ्याविरुद्ध केली पोलिसात तक्रार.

पुणे : ९ ऑगस्ट २०२२;शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकाने आपल्या शेजाऱ्याच्या पोपटाच्या किलबिलाटाच्या आवाजाने वैतागुन पोपटाच्या मालकाची पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुरेश शिंदे यांनी त्यांचा शेजारी अकबर खान यांची तक्रार केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि खान हे दोघेही शेजारी आहेत. शिंदे यांनी अनेक वेळा पोपटाने उपद्रव निर्माण केल्याची तोंडी तक्रार केली होती परंतु खान यांनी काही कारवाई करण्याऐवजी शिंदे यांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. या मुळे हताश झालेल्या शिंदे यांनी खडकी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

पोपटाच्या आवाजा मुळे एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकले जाऊ शकते यावर विश्वास ठेवणे लोकांना कठीण वाटेल पण पुण्यात पाळीव प्राण्यांच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा अदखलपात्र गुन्हा असल्याने पोलिसांनी तक्रारदाराला बोलावून कारवाईचा इशारा दिला होता, याप्रकरणी त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा