मुंबई, १८ जुलै २०२२: महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसणार आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम लवकरच पक्षाचा राजीनामा देणार आहेत. रामदास कदम काही वेळातच उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी राजीनामा पाठवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार आहेत. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश गुवाहाटीतील शिंदे गटा सोबत दाखल झाले होते.
रामदास कदम हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. त्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह ते सुरत, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे पोहोचले. शिवसेना फुटल्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात ५० आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
शिवसेनेत फूट सुरूच
शिवसेनेत पक्ष सोडण्याचे नेत्यांचे पर्व सुरू आहे. यापूर्वी ५५ पैकी ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. यानंतर ठाणे, नवी मुंबईसह अनेक पालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नुकताच शिवसेना युवा अर्थात युवासेनेच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे