नवी दिल्ली, १ एप्रिल २०२१: नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. छोट्या बचत योजनांच्या व्याजदरामध्ये सरकारने मोठी कपात केली आहे. सर्वात मोठा धक्का सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) धारकांना असणार आहे.
वास्तविक, केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि सुकन्या समृद्धि योजना या छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी केले आहेत. वित्त मंत्रालयाने पीपीएफवरील व्याजदर कमी करून ६.४ टक्के केले आहेत. यापूर्वी पीपीएफवरील व्याज दर पीपीएफवर ७.१ टक्के होता.
आकडेवारीनुसार पीपीएफवरील व्याज ४६ वर्षांच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहे. यापूर्वी १९७४ मध्ये पीपीएफवरील व्याज ७ टक्क्यांपेक्षा कमी होते. म्हणजेच पीपीएफवरील ६.४% व्याज दर मागील ४६ वर्षात सर्वात कमी आहे. नवीन दर १ एप्रिल २०२१ पासून लागू होतील.
पीपीएफ व्यतिरिक्त किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धि योजनेतही व्याज दर कमी केले जातील. सुकन्या समृद्धि योजनेत व्याज ७.६ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आले आहे. या योजनेत ०.७ टक्क्यांची मोठी कपात झाली आहे.
त्याचबरोबर किसान विकास पत्रावरील व्याज दर ६.९ टक्के वरून ६.२ टक्के करण्यात आला आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर व्याज दरामध्ये ०.९ टक्क्यांची मोठी कपात झाली आहे, आता या योजनेतील गुंतवणूकीवर गुंतवणूकदारांना ५.९ टक्के दराने व्याज मिळणार आहे, त्या तुलनेत यापूर्वीच्या ६.८ टक्के व्याजदर होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे