उरळी कांचन, दि. १० जून २०२० : उरळी कांचन येथे दि.९ जून रोजी पंचायत राज व्यवस्थेत काम करणाऱ्या उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी (ता. ९) रात्री उशिरा निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, याबाबत उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दुजोरा दिला आहे. संबधित महिला पदाधिकाऱ्यास एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली आहे. उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने, संबंधित पदाधिकाऱ्यांचा स्वॅब सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा पुणे येथील शासकीय प्रयोग शाळेत पाठवला होता. हा तपासणी अहवाल मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आला. यात संबधित महिला पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात १७ एप्रिलला उपचार घेत असलेली उरुळी कांचन येथील एक सत्तेचाळीस वर्षीय महिला, ही पूर्व हवेलीमधील कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती. त्यानंतर ५६ दिवसांच्या कालावधीत उरुळी कांचन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, कदमवाकवस्ती या पूर्व हवेलीमधील विविध गावात २० हून अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी तीन जणांचा मृत्यु झाला तर सतरा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, वरील राजकीय महिला पधाधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने, उरुळी कांचन परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, ‘उरुळी कांचन येथील राजकीय महिला पदाधिकाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट येताच, संबधित महिला पदाधिकारी राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तर संबधित महिला पदाधिकाऱ्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबधित महिला पदाधिकाऱ्यांचे घरातील नातेवाईक व संपर्कात आलेल्या लोकांना घरातच कॉराेन्टाईन करण्यात आले आहे.’ कॉरोन्टाईन करण्यात आलेल्यांना स्वॅब तपासणीसाठी कदमवाकवस्ती येथील कोरोना केअर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये स्वॅब घेतल्यानंतर, स्वॅब तातडीने पुण्यातील शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. संबधित महिला पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचे कोरोना अहवाल आल्यानंतरच, महिला पदाधिकाऱ्यांचे घरातील नातेवाईक व संपर्कात आलेल्यांपैकी कोणी कोरोना बाधीत आहे की नाही हे समजणार आहे. असे वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम यांनी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे