पुणे, दि. १९ जुलै २०२०: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-८९) यांचा कोरोना रिपोर्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथून पुण्यात हलवण्यात आलं आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्रानी यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं बाबाजानी दुर्रानी यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बाबाजानी दुर्रानी यांची शुक्रवारी अँटिजेन चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियावरून शनिवारी माहिती दिली.
याआधी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी