काश्मीरमध्ये आणखी एका हिंदू कर्मचाऱ्याची हत्या, दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरची केली हत्या

जम्मू-काश्मीर, 2 जून 2022: जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला. या हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजय कुमार हे राजस्थानचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती.

विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील स्थानिक ग्रामीण बँकेत तैनात होते. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ते राजस्थानमधील हनुमानगडचे रहिवासी होते. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केलीय.

सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत आहेत दहशतवादी

खोऱ्यातील हिंदू नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. अलीकडेच, बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या आणि कुलगाममध्ये एका महिला शिक्षिकेच्या हत्येविरोधातही मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. सर्व स्थलांतरित सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी तैनात करावं, अशी काश्मिरी पंडितांची मागणी होती.

कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी तैनात केलं जाईल

दहशतवादी घटना पाहता बुधवारी, पंतप्रधानांच्या विशेष पॅकेज अंतर्गत, जम्मू प्रशासनाने काश्मीरमध्ये तैनात असलेल्या स्थलांतरितांना आणि जम्मू विभागातील इतर कर्मचाऱ्यांना 6 जूनपर्यंत खोऱ्यातील सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेशही जारी केले होते. आदेशानुसार, काश्मीर विभागात पंतप्रधान पॅकेज अंतर्गत तैनात अल्पसंख्याक समुदायातील कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी पाठवले जाईल.

खोऱ्यातील हत्या थांबेना

31 मे- कुलगाममधील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.

25 मे 2022 – काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.

24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

17 मे 2022- बारामुल्ला येथील वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

12 मे 2022 – काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.

12 मे 2022- पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

9 मे 2022 – शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले.

2 मार्च 2022- कुलगाममधील सांडू येथे दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा