नवी दिल्ली, २५ जुलै २०२० : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कोरोनाच्या संकटकाळातही केंद्र सरकार गरिबांकडून नफा मिळवतेय, त्यामुळे हे गरीब विरोधी सरकार आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी २१ दिवसांसाठी देशभर लॉकडाऊन जाहीर केले. अचानक करण्यात आलेल्या या लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला. मात्र गरीब ,तळहातावर पोट असलेल्या मजूरांना याचा सर्वात जास्त त्रास झाला. कामानिमित्त दुसऱ्या राज्यांत किंवा शहरांत राहत असलेले हे कामगार होते ते तिथेच अडकले. आपापल्या घरी जाण्यासाठी अनेकांनी पायी प्रवास करत आपलं गाव गाठलं. काहींचे जीवही गेले. त्यानंतर या मजूरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयानं राज्य सरकारांशी समन्वय साधून श्रमिक ट्रेन सुरू केल्या. सुरुवातीला या मजदुरांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही असे सांगितले गेले. मात्र अनेक मजदुरांनी रेल्वेवर पैसे मागितल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
काही ठिकाणी कामगारांना मोफत प्रवास दिला गेला तर बऱ्याच ठिकाणी गरीब मजदुरांकडून पैसे उकळण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या. याबाबत अजूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणाव दिसून येतो. काँग्रेसद्वारे सतत आरोप करण्यात येत आहे कि, केंद्र सरकारने श्रमिकांकडून प्रवासाच्या तिकिटासाठी पैसे मागितले. आज काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ”रोगाचे ढग जमले आहेत, लोकं संकटात आहेत, फायदा घेऊ शकतो. – संकटाला नफ्यात बदलून गरीब विरोधी सरकार कमाई करत आहे.”
राहुल गांधींच्या या ट्विटवर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टीका करत म्हटले कि,देशाला लुटणारेच सब्सिडीला नफा बोलू शकतात. रेल्वेने राज्यांकडून घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम श्रमिक ट्रेन्स चालवण्यासाठी खर्च केली आहे. आता लोकं विचारतायत कि सोनियाजींनी तिकिटाचे पैसे देण्याच्या आश्वासनाचं काय झालं? असा टोला त्यांनी राहुल गांधींना आपल्या ट्विटमधून लगावला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी