राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी पात्र असलेल्या तब्बल २४४ उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या उपक्रमाला गती दिली असून, यामुळे दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मोहिमेअंतर्गत, गट ‘क’ प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील १६२ उमेदवारांपैकी ९७ उमेदवारांना नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गट ‘ड’ प्रवर्गात प्रतीक्षा यादीत असलेल्या २४१ उमेदवारांपैकी १४७ उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की, अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याव्यतिरिक्त, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे आणखी ४६ उमेदवारांची शिफारस पाठविण्यात आली आहे. या पुढाकारामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल, तसेच शेकडो कुटुंबीयांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शासकीय सेवेत भरतीची वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































