दिनेश कुमार खारा यांची एसबीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

नवी दिल्ली, ७ ऑक्टोंबर २०२०: दिनेश कुमार खारा यांना देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे अध्यक्ष म्हणून सरकारनं मंगळवारी नियुक्त केलं. खारा सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्वात वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आहेत. मंगळवारी ते तीन वर्षांची मुदत संपणा-या रजनीश कुमारांची जागा घेतील. वित्त मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं दिनेशकुमार खारा यांची एसबीआय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. खारा यांची मुदत पदभार स्वीकारल्यापासून किंवा ७ ऑक्टोबर, २०२० पासून किंवा पुढील आदेश होईपर्यंत तीन वर्षे असेल. गेल्या महिन्यात बँक बोर्ड ब्युरोनं (बीबीबी) एसबीआयचा पुढील अध्यक्ष म्हणून खारा यांच्या नावाची शिफारस केली होती.

प्रस्थापित परंपरेनुसार एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालकांपैकी केवळ एकाला बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाते. विशेष म्हणजे २०१७ मध्ये अध्यक्षपदासाठी खारा हेदेखील दावेदार होते. ऑगस्ट २०१६ मध्ये खारा यांना तीन वर्षांसाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. सन २०१९ मध्ये झालेल्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांना दोन वर्षांचा सेवा विस्तार मिळाला.

दिल्ली विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यास संकायातील माजी विद्यार्थी, खारा सध्या एसबीआयच्या ग्लोबल बँकिंग विभागाचे प्रमुख आहेत. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते एसबीआय फंड्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एमडी आणि सीईओ म्हणून कार्यरत होते.

खारा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून १९८४ मध्ये एसबीआयमध्ये रुजू झाले. सहयोगी बँक आणि भारतीय महिला बँक यांचे एप्रिल २०१७ मध्ये एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात खारा यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा