फलटण, सातारा १३ ऑगस्ट २०२३ : ‘‘शासनातर्फे पत्रकारांना देण्यात येणारी वैद्यकीय मदत व ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारा सन्मान निधी याची व्याप्ती वाढवून, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या सूचनांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेतले जातील,’’ असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील दरे (ता.महाबळेश्वर) येथील निवासस्थानी, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्त्वात, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करुन राज्यातील पत्रकारांच्या महत्त्वाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. या चर्चेमध्ये ‘लोकवृत्त’ (सातारा) चे संपादक सुजित आंबेकर, ‘ए.बी.पी.माझा’चे सातारा जिल्हा प्रतिनिधी राहुल तपासे, पत्रकार संतोष नलवडे यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, युवा उद्योजक अक्षय गवळी उपस्थित होते.
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधून पत्रकारांना देण्यात येणारी वैद्यकीय मदतीची रक्कम सध्याच्या वैद्यकीय खर्चानुसार अतिशय तुटपुंजी आहे, त्यामध्ये भरघोस वाढ करण्यात यावी. तसेच ज्येष्ठ निवृत्त पत्रकारांना देण्यात येणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीमधील मानधन यामध्येही दरवर्षी वाढ होईल यापद्धतीने कार्यवाही व्हावी. तसेच निवृत्त पत्रकार निधन पावल्यानंतर त्याचे मानधन त्यांच्या वारसास (फक्त पती/पत्नीस) हयात असेपर्यंत मिळण्याची तरतूद करावी, निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या आरोग्याबाबतीतल्या सर्व तपासण्या व त्यानुसारची औषधे मोफत मिळण्यासाठी नजिकच्या ‘आपला दवाखाना’मध्ये सोय करावी, इत्यादी मागण्यांसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये किमान रुपये १ हजार कोटी रुपयांची कायमस्वरुपी ठेव निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी हा निधी स्वायत्त विश्वस्त संस्था असल्यामुळे यातील तरतुदीनुसार विविध औद्योगिक कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडातून शासनाने रक्कम उभी करावी अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ‘‘या सर्व मागण्या व सूचनांबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल’’, असे सांगितले.
‘‘पत्रकारांनी शासनाच्या विविध सामाजिक लाभाच्या योजनांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर केल्यास या योजनांचे लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अर्थात हे करत असताना शासनाच्या धोरणामध्ये काही कमतरता असेल तर तीही सकारात्मक पद्धतीने पत्रकारांनी शासनाच्या निदर्शनास आणली पाहिजे’’, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हास्तरावरील लघु वृत्तपत्रांच्या संपादकांच्या विविध मागण्याही यावेळी रविंद्र बेडकिहाळ व विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांच्यापुढे सविस्तरपणे सांगितल्या. ‘‘त्याबाबत आपण लवकरच राज्यस्तरीय जिल्हा वृत्तपत्रांच्या संपादकांशी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी निश्चितपणे वेळ देवू’’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
‘‘राज्यशासन वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक आहे. पत्रकारांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेले विविध निर्णय योग्य आहेत. तथापी, पत्रकारांच्या सर्वच मागण्यांबाबत विधीमंडळामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे लवकरात लवकर समिती नेमून त्यामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत कायमस्वरुपी दीर्घ लाभाचे धोरण मुख्यमंत्र्यांनी घ्यावे’’, अशी विनंती आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी केली.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या विस्तारासाठी व पोंभुर्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाने विशेष तरतुद करुन ते गाव पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे, असे यावेळी विनोद कुलकर्णी व सुजित आंबेकर यांनी सूचवले. त्याबाबतही, ‘‘तसा प्रस्ताव त्वरित सादर करावा. आपण त्यात सकारात्मक लक्ष घालू’’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार