भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट २०२१: भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. भारत बायोटेकची इंट्रानेसल लस ही नाकावाटे घेण्याची पहिली लस आहे जिच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मान्यता मिळाली आहे. भारतात मानवी क्लिनिकल चाचण्याना सामोरी जाणारी अशा प्रकारची ही पहिलीच कोविड -१९ प्रतिबंधक लस आहे. BBV154 ही इंट्रानॅसल रेप्लीकेशन-डेफिसिएंट चिंपांझी एडेनोव्हायरस SARS-CoV-2 लस आहे. BBIL कडे अमेरिकेतील सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठाचे परवानाधारक तंत्रज्ञान आहे.

पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी १८ ते ६० वर्षे वयोगटातल्या व्यक्तींवर पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना या लसीचा कुठलाही त्रास जाणवला नाही. असे कंपनीने म्हटले आहे. कोणतीही गंभीर घटनेची नोंद नाही. पूर्वी, पूर्व-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासात ही लस सुरक्षित, रोगप्रतिकारक असल्याचे आढळले. या लसीने प्राण्यांमध्ये केलेल्या अभ्यासात अँटीबॉडीज तयार केल्या होत्या.

नाकावाटे विषाणू करतो शरीरात प्रवेश

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात. करोनाचा विषाणू फुफ्फुसांना सर्वाधिक धोका पोहचवतो.

सध्या देण्यात येणाऱ्या लसींमध्ये आणि नेजल व्हॅक्सिनमध्ये काय फरक?

सध्या भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’, रशियाची स्पुटनिक व्ही लस दिली जात आहे. मात्र या लसी इंटरामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. त्यापेक्षा ही नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जातोय. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. तसेच सध्या देण्यात येणाऱ्या सर्व लसी या दोन डोसच्या असल्या तरी ही नेजल व्हॅक्सिन एका डोसची असणार आहे. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचे दुष्परिणाम कमी असणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा