संरक्षण विभागास राज्य शासनाची जमीन पुणे मेट्रोसाठी वापर करण्यास मान्यता

6
मुंबई, 7 ऑक्टोंबर 2021: राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली असून, या बैठकीत संरक्षण विभागास राज्य शासनाची जमीन पुणे मेट्रोसाठी वापर करण्यास मान्यता देण्यात आलीय. जुन्या पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील संरक्षण विभागाच्या जमिनीच्या बदल्यात राज्य शासनाच्या मालकीची जमीन संरक्षण विभागास देण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत परवानगी दिलीय.
संरक्षण विभागाची 10.49 एकर इतकी जमीन पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करून त्या बदल्यात मौ.येरवडा येथील जमीन कामयस्वरुपी संरक्षण विभागास देण्यात येईल. पुणे महानगरपालिकेस रस्ता रुंदीकरणासाठी हस्तांतरीत होणाऱ्या 10.49 एकर जमिनीपैकी 3 एकर 34.1 आर जमीन राईट ऑफ वे पद्धतीने पुणे मेट्रो प्रकल्पास देण्यात येईल.
पुणे मेट्रोच्या दोन्ही प्राधान्य मार्गांची कामं पूर्ण
पुण्यात मेट्रोच्या (Pune Metro) कामाने वेग पकडला आहे. प्राधान्य मार्गावर मेट्रोचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे मेट्रोच्या दोन्ही प्राधान्य मार्गांची कामं पूर्ण झाली आहेत. या मार्गांवरच्या स्थानकांची कामंही प्रगतीपथावर आहेत. पुढच्या काही दिवसांत प्रवासी सेवा सुरू करता यावी यासाठी मेट्रोकडून इतर तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. या सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षाच्या अखेरपर्यंत पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा