पिंपरी, १६ एप्रिल २०२३: थेरगाव येथील केजुदेवी बंधारा येथे बंधाऱ्याच्या वर आणि खालील बाजूला पवना नदीपात्रात जलपर्णी साचली असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढल्यानंतर वरील बाजूने जलपर्णी वाहून आल्याने ही जलपर्णी साचल्याचे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमध्ये दरवर्षी जलपर्णीचा थर साचल्याचे चित्र पाहण्यास मिळते. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने ही जलपर्णी काढण्याचे काम कंत्राटदाराला दिले जाते. पावसाळा सुरू होईपर्यंतदेखील नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नसल्याचे चित्र दरवर्षी पाहण्यास मिळते. यंदा जानेवारी महिन्यापासून नंधामधील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, पवाना, इंद्रायणी आणि मुळा अशा तिन्ही नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे काम सध्या केले जात आहे. त्याचे ड्रोन कॅमेरॉद्धारे शूटींगदेखील करण्यात आली आहे. केजुदेवी बंधारा येथे जलपर्णी नदीच्या वरील बाजूने वाहून आली असावी, ही जलपर्णी लवकरच काढण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर